जेएसडब्‍ल्‍यू डोलवी परिसरातील वाढत्या अपघातांवर भाजप महिला आघाडी आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग-पेण मार्गावरील जेएसडब्‍ल्‍यू डोलवी कंपनी परिसरात वारंवार होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला आघाडीच्या रायगड जिल्हाध्यक्षा डॉ. चित्रा आस्वाद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.

याबाबत चित्रा पाटील यांनी भाजपच्‍या शिष्‍टमंडळासह जिल्‍हाधिकारी डॉ. किशन जावळे यांची भेट घेतली आणि सविस्‍तर चर्चा केली. अलिबाग-पेण मार्गावरील जेएसडब्‍ल्‍यू कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. पोलीस चौकी ते संजिवनी हॉस्पिटल या दरम्यान धरमतर पोर्टकडे जाणाऱ्या वाहनांचीही सतत वर्दळ असते. याच भागात ट्रेलर व मोठ्या ट्रकचे पार्किंग यार्ड असून अनेक मालवाहू वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांत या परिसरात पाच ते सहा अपघात घडल्याचे नमूद करत, आठ दहा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने धोका अधिक वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यावर तातडीने उच्च क्षमतेचे पथदिवे बसविणे, जेएसडब्‍ल्‍यू कंपनीमार्फत सुरक्षा रक्षक नियुक्त करणे, तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे निर्माण होणारी धूळ कमी करण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी मारण्याच्या सूचना कंपनीला देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जेएसडब्‍ल्‍यू  कंपनीचे अधिकारी, धरमतर जेट्टी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावून कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्याची मागणीही डॉ. पाटील यांनी केली आहे. या चर्चेत जिल्‍हाधिकारी यांनी सकारात्‍मक भूमिका घेतल्‍याचे चित्रा पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार पंडित पाटील, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस अँड. महेश मोहिते, अँड. मनस्‍वी मोहीते पल्लवी आठवले  यांच्‍यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.