अलिबाग (प्रतिनिधी): चिंचोटी ग्रामपंचायतीअंतर्गत राबविण्यात आलेल्या जल जीवन मिशन योजनेमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश नारायण पाटील यांनी केला आहे. अस्तित्वात नसलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या नावाने कागदपत्रे तयार करून सुमारे ७६ लाख १६ हजार ३४५ रुपयांच्या निधीचा अपहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ॲड. पाटील यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, चिंचोटी गावातील जल जीवन मिशन योजना प्रत्यक्षात अपूर्ण असूनही ती डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. गावातील ३४९ लाभार्थ्यांना नळ जोडणी देण्यात आल्याची नोंद करण्यात आली असून त्यातील काही लाभार्थी बोगस असल्याचा आरोप आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याचे, ग्रामस्थांची कोणतीही तक्रार नसल्याचे आणि ठेकेदाराचे अंतिम बिल अदा करण्यास हरकत नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित समितीच्या नावाने देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरामध्ये अशी कोणतीही ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापन झाल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणात तत्कालीन सरपंच बिंदिता पाटील, ग्रामसेवक पी. डी. दिवकर, ठेकेदार, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यावर शासनाची फसवणूक व निधी अपहार केल्याचा आरोप करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर जल जीवन मिशन योजनांचीही सखोल चौकशी करून ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी ॲड. राकेश पाटील यांनी केली आहे.
Home ताज्या बातम्या अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे ७६ लाखांहून अधिक निधीचा अपहार केल्याचा आरोप; चौकशीची...






