रोहा (प्रतिनिधी) : रोहा शहरातील मातोश्री मंगल कार्यालया जवळ राहणाऱ्या 54 वर्षीय महिलेने आजाराला कंटाळून कुंडलिका नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर संबंधित महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.
विनया विनोद कदम (वय 54) या 23 जून रोजी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी रोहा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता, 24 जून रोजी सकाळी एका महिलेने कुंडलिका नदीच्या काठावरून उडी मारल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तात्काळ एसव्हीआरएस रेस्क्यू टीमची मदत घेत शोधमोहीम सुरू केली. नदीपात्रात आणि परिसरात शोध घेत असताना रोहापासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर अंतरावरील कुंभोशी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला. रेस्क्यू टीमने मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी तो विनया कदम यांचाच असल्याची ओळख पटविली.
नातेवाईकांच्या माहितीनुसार, विनया कदम या दीर्घकाळापासून आजाराने त्रस्त होत्या. त्यातून नैराश्य येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई प्रशिला चव्हाण करीत आहेत.





