आक्षी–नागाव मार्गावरील एसटी बससेवा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी


अलिबाग (प्रतिनिधी) : आक्षी–नागाव मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा नादुरुस्त बेली पुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव १५ ऑगस्ट २०२५ पासून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार तसेच पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने ही बससेवा तात्काळ पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन शरद राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
यासंदर्भात कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लवकरच शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी एसटी बस हे शिक्षणासाठी प्रवासाचे सर्वात विश्वासार्ह आणि परवडणारे साधन आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त खर्च, वेळेचा अपव्यय आणि प्रवासातील अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव एसटी बससेवा बंद ठेवण्यात आली असली तरी याच मार्गावरून खासगी बस, पर्यटक वाहने, मालवाहतूक वाहने तसेच इतर वाहतूक नियमित सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेवरच निर्बंध का लादण्यात आले आहेत, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आक्षी–नागाव हा परिसर केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे तर पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो. बससेवा बंद असल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असून त्याचा परिणाम स्थानिक व्यावसायिकांवरही होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांच्या भावना आणि दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन आक्षी–नागाव मार्गावरील एसटी बससेवा तात्काळ पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. सचिन राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या मागणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये बससेवा पुन्हा सुरू होण्याबाबत अपेक्षा निर्माण झाली आहे.

निवेदन देत्यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते