अलिबाग (प्रतिनिधी) : सप्टेंबर महिन्यात पुलाच्या बांधकामाचे टेंडर मंजूर होऊन तब्बल दहा महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुलाचे काम रखडल्यामुळे दोन गावांमधील संपर्क तुटला असून रुग्ण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळे निर्माण झाले असून अनेक दिवसांपासून नागरिकांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावात पाणीटंचाईची समस्याही गंभीर बनली असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी शेकापच्या वतीने प्रशासनाला पाच दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. या कालावधीत पर्यायी व्यवस्था किंवा पुलाच्या कामाबाबत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. नागरिकांना न्याय मिळेपर्यंत शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सप्टेंबरमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही काम सुरू न झाल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Home ताज्या बातम्या पूल बांधकाम रखडल्याने दोन गावांचा संपर्क तुटला; शेतकरी कामगार पक्षाचा आंदोलनाचा इशारा





