अलिबाग (प्रतिनिधी) : देहेनगाव येथील पुलाच्या रखडलेल्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे पर्यायी बायपास मार्ग वाहून गेल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून दैनंदिन वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पुलाच्या बांधकामाची वर्क ऑर्डर सप्टेंबर महिन्यात देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष कामाला एप्रिल महिन्यात सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी हे काम हाती घेऊ नये, अशी विनंती ग्रामस्थांनी ठेकेदार व प्रशासनाकडे केली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला.

पुलाची अवस्था अत्यंत गंभीर नसतानाही तो पाडण्यात आला. काम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराकडून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण होईल याची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नसल्याने आज नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणारे स्टील आणि अन्य साहित्य अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांनुसार आहे की नाही, याचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
या संदर्भात कार्यकारी अभियंता खरे मॅडम यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असून नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित ठेकेदाराला काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना म्हटले की, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूल आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सर्व संबंधित अधिकारी, कार्यकारी अभियंते आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नागरिकांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. अनेक अधिकारी दूरध्वनीला प्रतिसाद देत नसल्याची तक्रारही त्यांनी केली.
देहेनगावचा हा पूल माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात मंजूर झाला होता. गेली अनेक दशके या पुलावरून अवजड वाहतूक सुरळीत सुरू होती. त्यामुळे नव्याने उभारला जाणारा पूल उच्च दर्जाचा आणि निर्धारित तांत्रिक निकषांनुसार बांधण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
देहेनगावसह परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा पंडितशेठ पाटील यांनी व्यक्त केली.





