नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यास होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ पनवेल-उरणच्या भूमिकन्या तथा आगरी-कोळी समाजातील प्रसिद्ध कलाकार रश्मिता पोपेटा यांनी पनवेल- करंजाडेमधील चिंचपाडा पुलाजवळ सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस उजाडला आहे. मात्र, चार दिवस उलटूनही प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने साधी विचारपूसही न केल्याने भूमिपुत्रांमध्ये संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे. आगरी, कोळी, कराडी समाजाच्या हक्कांसाठी संपूर्ण आयुष्य संघर्ष करणारे लोकनेते दिबा पाटील हे केवळ एक नाव नसून, भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या एकमेव मागणीसाठी रश्मिता पोपेटा यांनी अन्न-पाण्याचा त्याग करत जीवाची पर्वा न करता उपोषणाचे हत्यार उगारले आहे. मात्र, चौथा दिवस संपत आला तरी प्रशासनाने या आंदोलनाची कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही. अन्न-पाण्याविना रश्मिता पोपेटा यांची प्रकृती तासागणिक खालावत असतानाही प्रशासनाची उदासीनता संतापजनक असल्याची प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आणि आगरी-कोळी समाजातील तरुणांनी व्यक्त केली आहे. ‘दिबा पाटील हे आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा पाटील यांचेच नाव लागले पाहिजे. यासाठी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचीही आमची तयारी आहे,’ असा इशारा संतप्त तरुणांनी दिला आहे. मुंबईत आगरी-कोळी समाजाचे अस्तित्व दिवसेंदिवस पुसट होत चालले असून, नवी मुंबईतही अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला जसे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे नेतृत्व लाभले, तसेच आगरी-कोळी समाजाला रश्मिता पोपेटा यांच्या रूपाने संघर्षशील नेतृत्व लाभल्याची भावना समाजबांधव व्यक्त करत आहेत. प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केले आणि रश्मिता पोपेटा यांना काही झाले, तर त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, असा स्पष्ट इशाराही भूमिपुत्र संघटना आणि तरुणांनी दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी आता केवळ एका व्यक्तीच्या उपोषणापुरती मर्यादित राहिलेली नसून, ती संपूर्ण भूमिपुत्रांच्या अस्मिता, स्वाभिमान आणि अस्तित्वाच्या लढाईचे प्रतीक बनली असल्याचे चित्र सध्या पनवेल-उरण परिसरात पाहायला मिळत आहे.
Home ताज्या बातम्या पनवेलमध्ये रश्मिता पोपेटा यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस; दिबा पाटील यांच्या नावासाठी...





