मुंबई (प्रतिनिधी): विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या वतीने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री संजय शिरसाट यांच्यासह आमदार कृपाल तुमाने, मनीषा कायंदे, दुष्यंत चतुर्वेदी आणि चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे सचिन अहिर यांच्या उमेदवारीला सत्ताधारी पक्षाचा भक्कम पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले.
विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक लवकरच होणार असून, या पदासाठी महायुतीने सचिन अहिर यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. अर्ज दाखल करताना उपस्थित नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देत निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
सचिन अहिर हे शिवसेनेतील वरिष्ठ नेते असून, त्यांचा विधिमंडळातील अनुभव आणि संघटनात्मक कामाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे विधान परिषदेतील सत्ताधारी पक्षाची भूमिका आणखी मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




