रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून दरड कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने तातडीने खबरदारीची पावले उचलली आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी दरडप्रवण क्षेत्रातील 20 गावांमधील एकूण 1,146 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
महाड तालुक्यात एकूण 72 गावे दरडप्रवण क्षेत्रात येतात. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, ग्रामपंचायती आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ज्या गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता अधिक आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून स्थलांतराची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
स्थलांतरित नागरिकांची निवास, अन्न, पिण्याचे पाणी आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच दरडप्रवण भागातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महसूल, पोलीस, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांना सतर्क ठेवण्यात आले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतकार्य सुरू करता यावे, यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी काही गावांतील नागरिकांचेही प्रतिबंधात्मक स्थलांतर करण्यात येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
Home ताज्या बातम्या महाडमध्ये मुसळधार पावसाची धास्ती; दरडप्रवण भागातील 1,146 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर




