पनवेल (प्रतिनिधी): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या ॲड.मानसी म्हात्रे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. उपोषणकर्त्या रश्मिता पोपेटा यांच्या उपोषणस्थळी भेट देत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर तीव्र टीका केली.
यावेळी ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या की, “लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. नवी मुंबईचा इतिहास लोकनेते दि. बा. पाटील यांच्या योगदानाशिवाय लिहिलाच जाऊ शकत नाही. शेतकरी, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळे विमानतळाला त्यांचे नाव देणे ही केवळ मागणी नसून भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे.”
त्यांनी पुढे सरकारला सवाल करत म्हटले की, “आमच्या नेत्याचे नाव देण्यासाठी सरकार अजून किती काळ टाळाटाळ करणार? सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींना भूमिपुत्रांची ताकद अजूनही अजमावून पाहायची आहे का? जनभावनांचा आदर करून सरकारने तातडीने लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याचा निर्णय घ्यावा.”
उपोषणकर्ती रश्मिता पोपेटा यांच्या त्यागाचे कौतुक करत मानसी म्हात्रे म्हणाल्या की, “रश्मिता पोपेटा यांनी सुरू केलेला हा लढा वैयक्तिक नसून संपूर्ण भूमिपुत्रांच्या अस्मितेचा लढा आहे. त्यांच्या संघर्षाला आणि त्यागाला लाल सलाम. या आंदोलनात सर्व समाजघटकांनी सहभागी होऊन लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी एकजूट दाखवावी.”
यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.
Home ताज्या बातम्या लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठीचा लढा हा भूमिपुत्रांच्या अस्मितेचा प्रश्न; उपोषणकर्ती...






