अलिबाग (प्रतिनिधी): काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांच्या ७९ व्या जयंती व पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सातीर्जे येथे आयोजित रक्तदान शिबिराला अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम समितीचे सभापती प्रशांत नाईक यांनी भेट देत समाजोपयोगी उपक्रमांना आपला पाठिंबा व्यक्त केला.
स्वर्गीय मधुशेठ ठाकूर सामाजिक संस्था आणि जिल्हा रुग्णालय शासकीय रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात दोघांनी स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच रक्तदाते, आयोजक व स्वयंसेवकांशी संवाद साधून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी समाजहिताच्या उपक्रमांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. प्रशांत नाईक यांनी स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांचा सेवाभाव व लोकसंपर्क प्रेरणादायी असल्याचे सांगत अशा विधायक उपक्रमांना नगरपरिषदेचे सहकार्य कायम राहील, असे स्पष्ट केले.
या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. यावेळी नगरसेविका अश्विनी ठोसर, निवेदिता वाघमारे, नगरसेवक ॲड. ऋषिकेश माळी, समीर ठाकूर, काँग्रेसचे नेते रविंद्र ठाकूर (काका), रविंद्र ठाकूर (नाना), ॲड. प्रवीण ठाकूर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






