पदकांपलीकडचा विचार! ‘नगराध्यक्ष चषक’मधून रायगडात घडतेय जलतरणाची नवी पिढी


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग येथील स्व. नमिता नाईक क्रीडा संकुलात ॲक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगड व अलिबाग नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नगराध्यक्ष चषक’ जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेकडो जलतरणपटूंनी सहभाग घेतला असून विविध गटांतील ८२ विजेत्यांचा पदके व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेत गट-२ मधील तनिष शिंदे याने ५० मीटर फ्रीस्टाईल व बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, तर ब्रेस्टस्ट्रोक व बटरफ्लायमध्ये रौप्यपदके जिंकली. खुल्या महिला गटात रुद्राशी टेमकर हिने फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय अशा चारही प्रकारांत सुवर्णपदके पटकावत आपला ठसा उमटवला.
पारितोषिक वितरण समारंभात नगरसेवक अनिल चोपडा, सागर भगत, नगरसेविका अश्विनी ठोसर, पोलीस अधिकारी किशोर साळे, श्रद्धा नवले, प्रियांका वाघ, राष्ट्रीय जलतरणपटू दिलीप वैद्य व प्रशिक्षक दत्ता तरे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्रशांत नाईक यांनी अलिबागमध्ये केवळ क्रीडा सुविधा उभारणे नव्हे, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. जलतरणासह विविध क्रीडा स्पर्धांचे नियमित आयोजन करून अलिबागला सर्वसमावेशक क्रीडा केंद्र म्हणून विकसित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.