रवींद्र कोळी यांच्यावरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध; मुद्रांक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन


अलिबाग(प्रतिनिधी) : पुण्यातील सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद सोमवारी अलिबागमध्ये उमटले. महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक राजपत्रित व अराजपत्रित कर्मचारी संघटना कृती समितीच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसभर कामकाज बंद ठेवत निषेध आंदोलन केले.

यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाच्या नावाने मागण्यांचे निवेदन सादर केले. रवींद्र कोळी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिन्ही आरोपींवर अजामीनपात्र कलमे लावून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करावी आणि त्यांना तात्काळ अटक करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

तसेच, या प्रकरणातील तपास अधिकारी यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि संबंधित पोलीस अधिकारी व आरोपी यांच्यातील संबंधांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली.

नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व कार्यालयांना महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळाच्या (MSF) माध्यमातून सुरक्षा उपलब्ध करून देण्यात यावी, सर्व कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही आणि इतर आवश्यक सुरक्षा यंत्रणा तातडीने बसवाव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. याशिवाय, पक्षकारांच्या वैयक्तिक वादातून विभागातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची अधिकृत तपशीलवार यादी (चेकलिस्ट) प्रसिद्ध करावी, मंजूर आकृतिबंधानुसार वर्ग एक ते वर्ग चारमधील सर्व रिक्त पदे तातडीने भरून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, ‘एक जिल्हा-एक नोंदणी’ धोरणाचा पुनर्विचार करून त्यात सुधारणा अथवा रद्द करावे तसेच राज्यातील सर्व नोंदणी कार्यालयांचे कामकाजाचे दिवस आणि वेळा समान कराव्यात, अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केल्या.

या आंदोलनामुळे सोमवारी अलिबागमधील नोंदणी व मुद्रांक कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प राहिले. शासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कर्मचारी संघटनेने दिला.