हाशिवरे येथे डेंग्यूसह साथीच्या रोगांविरोधात जनजागृती सभा; नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांचे मार्गदर्शन


अलिबाग (प्रतिनिधी): हाशिवरे गावात डेंग्यूसह विविध साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगळवारी जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक यांच्या उपस्थितीत आणि आरोग्य अधिकारी मा. भोपळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा उत्साहात पार पडली.

हाशिवरे गावात डेंग्यूचे काही रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, रोगांचा प्रसार रोखणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे हा या सभेचा प्रमुख उद्देश होता. यावेळी उपस्थित नागरिकांना डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली काळजी, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व, घर व परिसरात पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले.

याशिवाय मलेरिया, चिकुनगुनिया व इतर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबतही नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या जनजागृती अभियानात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, हाशिवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गाव डेंग्यूमुक्त ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.