पनवेल (प्रतिनिधी): पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील क्रांतिवीर लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध देहव्यापाराचा नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने (AHTU) पर्दाफाश केला आहे. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचत करण्यात आलेल्या या कारवाईत लॉज मॅनेजरसह तीन जणांना अटक करण्यात आली असून, घटनास्थळी दोन महिलाही आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांना क्रांतिवीर लॉजमध्ये लॉजिंग व्यवसायाच्या आडून अवैध देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी AHTUच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. संशयाची खात्री झाल्यानंतर पथकाने लॉजवर छापा टाकत कारवाई केली.
या कारवाईदरम्यान लॉज मॅनेजर, महिला पुरवणारा एक व्यक्ती आणि लॉजमधील वेटर अशा तिघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच घटनास्थळी दोन महिलांचीही सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांतील गंभीर कलमांनुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या अवैध रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच पनवेल परिसरातील इतर लॉजिंग व्यवसायांच्या आडूनही अशा प्रकारचे गैरप्रकार सुरू आहेत का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.
गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे अवैध देहव्यापार करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून, लॉजिंग व्यवसायाच्या आड सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





