817 वाहनचालकांवर कारवाई; 4 लाख 22 हजार 500 रुपयांचा दंड वसूल
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांविरोधात पोलीसांच्या वाहतूक शाखेने धडक कारवाई सुरू केली आहे. जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 1 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून 817 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 4 लाख 22 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
राज्य शासन आणि परिवहन विभागाच्या निर्देशानुसार सर्व जुन्या व नव्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नंबरप्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये, लेझर कोड, क्रोमियम होलोग्राम आणि कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक असल्यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित होते. बनावट नंबरप्लेट तयार करण्यावर प्रतिबंध येण्याबरोबरच चोरीची वाहने शोधणे, गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या वाहनांचा माग काढणे आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करणे शक्य होते.
मात्र, शासनाच्या वारंवार सूचना आणि मुदतवाढ देऊनही अनेक वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसविलेली नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे रायगड जिल्हा वाहतूक शाखेने जिल्ह्यातील प्रमुख चौक, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, शहरातील गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाच्या मार्गांवर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. तपासणीदरम्यान एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने आढळून आल्यास संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात पहिल्या वेळी 500 रुपये तर दुसऱ्या वेळी थेट 1 हजार 500 रुपये इतका दंड आकारला जातो.
वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना अधिकृत केंद्रातूनच एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत किंवा बनावट नंबरप्लेटचा वापर टाळण्याबरोबरच नियमांचे काटेकोर पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, एचएसआरपी नंबरप्लेटबाबतची तपासणी मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तातडीने आपल्या वाहनांवर अधिकृत एचएसआरपी नंबरप्लेट बसवून शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





