दिल्लीतून हुकूमशाहीविरोधात एल्गार; रायगडसह कोकणातील नागरिकांचा मोठा सहभाग
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी रायगडसह संपूर्ण कोकणातील नागरिकांनी एकजूट दाखवत दिल्लीमध्ये जोरदार आवाज उठवला. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोकप्रिय खासदार संजय सिंह उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर तीव्र टीका करत, विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यासह ठाणे, भिवंडी आणि कोकणातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये दाखल झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजाभाऊ ठाकूर म्हणाले की, नवी मुंबई विमानतळ ज्या भूमीवर उभारण्यात आले आहे, त्या भूमीसाठी रायगड आणि कोकणातील सर्वसामान्य नागरिकांनी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे या विमानतळाला स्थानिक भूमिपुत्रांच्या भावनांचा सन्मान करणारे दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
“काहीही झाले तरी विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देणार”, असा निर्धार व्यक्त करत ठाकूर यांनी सरकारच्या कथित हुकूमशाहीविरोधातही जोरदार हल्लाबोल केला. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या लढ्यात कोकणातील सर्वसामान्य जनता एकत्र असून, योग्य वेळी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपली ताकद दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनाच्या माध्यमातून केवळ विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न नसून, कोकणातील भूमिपुत्रांच्या अस्मितेचा आणि त्यांच्या भावनांचा सन्मान करण्याचा हा लढा असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
“ दि.बा. पाटील यांच्या नावासाठी जेव्हा पुन्हा एकत्र येण्याची वेळ येईल, तेव्हा रायगडसह संपूर्ण कोकण एकजुटीने उभे राहील,” अशी भीष्मप्रतिज्ञाच यावेळी करण्यात आली. उपस्थितांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.





