रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; म्हसळ्यात सर्वाधिक २५ मिमी पावसाची नोंद


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात गुरूवारी (दि. ६) सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाची नोंद झाली असून, म्हसळा तालुक्यात सर्वाधिक २५ मिमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ सुधागड येथे २४ मिमी, श्रीवर्धन येथे २२ मिमी, माथेरान येथे २०.२ मिमी, तर पेण आणि पोलादपूर येथे प्रत्येकी २० मिमी पावसाची नोंद झाली.

याशिवाय कर्जत येथे १८ मिमी, तळा येथे १७ मिमी, माणगाव आणि खालापूर येथे प्रत्येकी १६ मिमी, उरण आणि रोहा येथे प्रत्येकी १५ मिमी, महाड येथे १४ मिमी, पनवेल येथे १२.८ मिमी, अलिबाग येथे ९ मिमी, तर मुरूड येथे ६ मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी-जास्त होत असला तरी अनेक भागांत अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम असून, नागरिकांनी नदी-नाले, धबधबे आणि सखल भागांमध्ये जाताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.