पशुधन संवर्धनासाठी ‘पशुधन विमा योजना’ जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन


अलिबाग (प्रतिनिधी): केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पशुधन विमा योजना रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेबाबतची माहिती दुग्ध व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी शुक्रवारी (ता.7) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त रत्नाकर काळे आदींसह पत्रकार उपस्थित होते.
हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाणी, गंभीर अपघात तसेच विविध संसर्गजन्य व साथीच्या रोगांमुळे (उदा. लंपी स्किन डिसीज, घटसर्प इत्यादी) पशुधन दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत विमा संरक्षणाच्या माध्यमातून पशुपालकांना त्वरित आर्थिक नुकसानभरपाई उपलब्ध करून देणे, त्यांचे आर्थिक स्थैर्य कायम राखणे तसेच पशुपालक कर्जबाजारी होउ नये यासाठी ‘पशुधन विमा योजना’ रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ही विमा योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातर्फे अॅग्रीकल्चरल इन्शाॅरन्स कंपनी आॅफ इंडिया लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशी व संकरीत दुधाळ गायी, म्हशी, बैल, रेडे, शेळी, मेंढ्या यापैकी जास्तीत जास्त 10 पशुधनाचा विमा काढता येणार आहे. यामध्ये दुभती गाय/बैलसाठी कमाल विमा संरक्षित रक्कम 70 हजार, दुभती म्हैस/रेडा 80 हजार तर शेळी/मेंढीसाठी 7 हजार रुपये कमाल संरक्षित रक्कम असणार आहे.
पशुपालक लाभार्थी एक, दोन अथवा तीन वर्षाच्या कालावधीचा विमा काढू शकतात. यामध्ये लाभार्थी विमा हप्ता हिस्सा हा 15 टक्के असणार आहे. तर उर्वरित 85 टक्के हप्त्याचा हिस्सा हा राज्य व केंद्र शासन मिळून करणार आहे. त्यामुळे शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पशुपालकांनी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती वैकुंठ पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पशुपालकांनी जवळील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, ग्रामसेवक, गो-मित्र यांच्याशी संर्प साधावा असे, आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उपस्थित पत्रकारांचा सभापती वैकुंठ पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या
चैकट:
आवश्यक कागदपत्रे:
1. पशुपालकाचे ओळख पत्र: मतदार ओळखपत्र/आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/बँक पासबुक (पहिल्या पानाची स्वयंप्रमाणित प्रत).
2. पशुधनाचा सर्व बाजूंचा उभा असलेला फोटो (टॅग नंबर स्पष्ट दिसणारा) आणि पशुपालाकासोबत पशुधनाचा उभा असलेला फोटो ज्यामध्ये कानातील बिल्ला (इअर टॅग) स्पष्टपणे दिसणे बंधनकारक आहे. विमाकर्ता यूआयडी प्रणालीव्यतिरिक्त आरएफआयडीचा वापर करू शकतो.
3. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद/भारतीय पशुवैद्यकीय परिषद यांच्याकडे नोंदणीकृत खाजगी/शासकीय पशुवैद्यकीय व्यावसायिकाने प्रमाणित केलेले पशुस्वास्थ्य प्रमाणपत्र.