गणेशोत्सवापूर्वी माणगाव बायपासवर ‘वन-वे’ वाहतूक सुरू करण्याचे निर्देश


माणगाव (प्रतिनिधी): मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाला गती देऊन गणेशोत्सवापूर्वी बायपासवर ‘वन-वे’ वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात मागील महिन्यात झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा माणगाव शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली.

ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी मुंबई–गोवा महामार्गाच्या माणगाव बायपासच्या कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाच्या कामाच्या गतीवर काहीसा परिणाम झाला होता. मात्र, त्यानंतर कामाला वेग देण्यात आला असून ऑगस्टअखेरपर्यंत बायपासवर ‘वन-वे’ वाहतूक सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्नशील असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपासचे काम वेगाने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कामाची गती कायम ठेवावी, महामार्गाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे तसेच गणेशोत्सवापूर्वी बायपासवर ‘वन-वे’ वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.