अलिबाग(प्रतिनिधी): मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या संकल्पनेतून तसेच शिक्षणाधिकारी संजय नाईकडे (प्राथमिक) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभाग, रायगड जिल्हा परिषद आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाची शैक्षणिक वर्ष 2026-27मध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषद शाळांमधील विद्याथ्र्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 28 व 29 जुलै रोजी जिल्हास्तरीय, 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय तसेच 3 ते 6 ऑगस्टदरम्यान केंद्रस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम ‘टिचिंग अॅट द राईट लेव्हल‘ या पद्धतीवर आधारित आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, म्हसळा, मुरूड, पनवेल, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन, सुधागड, तळा आणि उरण या 15 तालुक्यांमध्ये करण्यात येत आहे.या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना भाषा व गणित विषयाचे कृतीआधारित, गटनिहाय अध्ययन-अध्यापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भाषा व गणित पेटीचा प्रभावी वापर, विद्याथ्र्यांना दररोज स्वाध्याय देणे व त्याची नियमित तपासणी करणे, माता पालक गटाची मदत घेणे तसेच स्वयंसेवकांचा शैक्षणिक प्रक्रियेत सहभाग वाढविणे या महत्त्वाच्या बाबींवर प्रशिक्षणादरम्यान चर्चा व प्रात्यक्षिके घेण्यात आली.
विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी व गटनिहाय अध्ययन:
कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात 18 ऑगस्टपर्यंत इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्याथ्र्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या आधारे विद्याथ्र्यांचे वाचन स्तर आणि गणित स्तर निश्चित करून त्यानुसार गट तयार करण्यात येतील. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार दररोज दोन तासांचे गटनिहाय अध्ययन-अध्यापन सत्र राबविण्याचे नियोजन आहे. यामध्ये एक तास भाषा आणि एक तास गणित या पद्धतीने विद्याथ्र्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
नियमित देखरेख व मार्गदर्शन:
कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रतिनिधी यांच्यामार्फत नियमित शाळा भेटी, देखरेख व मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्याथ्र्यांची शैक्षणिक प्रगती सातत्याने तपासून आवश्यकतेनुसार अध्ययन-अध्यापनामध्ये सुधारणा करण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत भाषा व गणित कौशल्यांना अधिक बळकटी देण्याच्या दिशेने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.






