कुरूळ(प्रतिनिधी) : आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या सृजन प्राथमिक विद्यालय कुरूळ व सु. ए. सो. माध्यमिक विद्यालय कुरूळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना दीप अमावस्येचे महत्त्व समजावे तसेच पारंपरिक दिव्यांची माहिती मिळावी, या उद्देशाने शाळेत विशेष दीपपूजन व दिव्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनात पारंपरिक पणती, दिवटी यांच्यासह विविध प्रकारचे पितळी दिवे, कणकेचे दिवे तसेच आधुनिक काळातील सौर दिवे, सीएफएल बल्ब आदी प्रकाश साधने मांडण्यात आली होती. पारंपरिकतेपासून आधुनिकतेपर्यंत प्रकाशाच्या साधनांमध्ये झालेला बदल विद्यार्थ्यांना या प्रदर्शनातून अनुभवता आला.
यावेळी शिक्षिका व विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळ्या काढून त्याभोवती पणत्यांची सुंदर आरास केली होती. त्यामुळे शाळेचा परिसर दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. बालवर्गापासून इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध दिव्यांची माहिती जाणून घेतली आणि सुंदर सजावटीचा आनंद घेतला.
मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका संध्या घरत, सोनाली सातोपे, प्राथमिक विभागातील मानसी पाटील, सुषमा पाटील, पूजा घोसाळकर, मयुरी पाटील, तसेच माध्यमिक विभागातील अनुपमा चवरकर, प्रिया मनोरे, वृषाली रुईकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पारंपरिक संस्कृतीची ओळख, प्रकाशाचे महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानातील बदल यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व आनंददायी ठरला.




