सारळ येथे पशुधन लसीकरण व आरोग्य शिबिर; १०० हून अधिक जनावरांचे लसीकरण


अलिबाग (प्रतिनिधी): पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासोबतच पशुपालकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पशुवैद्यकीय चिकित्सालय, झिराड यांच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी ग्रुप ग्रामपंचायत सारळ हद्दीतील सारळ व म्हात्रोली परिसरात गाय व म्हैसवर्गीय प्राण्यांसाठी ‘लसीकरण, जंतनिर्मूलन व वंध्यत्व निर्मूलन शिबिर’ आयोजित करण्यात आले. या शिबिराला परिसरातील पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मोहिमेत जनावरांना लाळ्या-खुरकत (पायलाग) तसेच लम्पी त्वचा रोगापासून संरक्षणासाठी लसीकरण करण्यात आले. तसेच जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या जंतनिर्मूलनाच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. परिसरातील १०० हून अधिक गुरांचे लसीकरण करण्यात आले.

पशुधन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद अमितदादा नाईक यांच्या निवासस्थानी करण्यात आला. त्यांच्या घरातील सर्व जनावरांना लसीकरण करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सारळ हद्दीतील इतर पशुपालकांच्या जनावरांनाही लसीकरण करण्यात आले.

यावेळी पथकप्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ भोजने, पशुधन पर्यवेक्षक समाधान मेटकरी, तसेच धीरज पाटील व संकेत पाटील उपस्थित होते. ग्रुप ग्रामपंचायत सारळच्या माजी सरपंच अमृता अमित नाईक यांचीही यावेळी उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील पशुधन हे पशुपालकांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे पशुपालकांमध्ये लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित झाले.

पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासोबतच पशुपालकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणाऱ्या अशा लोकाभिमुख उपक्रमांना अमितदादा नाईक यांनी सदैव प्रोत्साहन देण्याची भूमिका कायम ठेवली असून, ग्रामीण भागातील पशुपालकांच्या हितासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन होणे गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.