अलिबाग (प्रतिनिधी) : महात्मा गांधी विद्यालय, हाशिवरे तसेच सारळ ग्रुप ग्रामपंचायत येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. दोन्ही ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा मुख्य प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
हाशिवरे येथील महात्मा गांधी विद्यालयात अमितदादा नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना यावेळी अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
यानंतर हाशिवरे येथील सुभाष चौक येथेही अमितदादा नाईक यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी नागरिक व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सारळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनेही ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथे अमितदादा नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास मा. सरपंच सौ. अमृता अमित नाईक, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर देशाभिमानाची भावना दिसून येत होती. दोन्ही ठिकाणी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, राष्ट्रप्रेम आणि एकात्मतेची भावना अनुभवायला मिळाली.









