पावसाळ्यात मोबाईलपेक्षा मैदानी खेळांना प्राधान्य द्या : डॉ. राजाराम हुलवान


अलिबाग (प्रतिनिधी) : आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी श्री दत्तगुरु जीतनगर मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन डॉ. राजाराम मायाप्पा हुलवान, अध्यक्ष माणुसकी प्रतिष्ठान, जीतनगर, महाराष्ट्र तथा संचालक, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था यांच्या शुभहस्ते उत्साहात करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एकूण बारा संघाने सहभाग नोंदविला असून स्पर्धेचे उत्तम नियोजन व आयोजन श्री दत्तगुरु वायशेत मंडळाकडून करण्यात आले आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राजाराम हुलवान यांनी सांगितले की, “पावसाळ्यात पाऊस पडतो म्हणून मुलांनी घरात बसून राहण्यापेक्षा मैदानी खेळ खेळले पाहिजेत. व्हॉलीबॉल, फुटबॉल यांसारखे खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि शारीरिक क्षमता वाढते.”
क्रिकेट हा खेळ वर्षातील इतर ऋतूंमध्येही खेळता येतो; मात्र पावसाळ्यात व्हॉलीबॉल, फुटबॉल यांसारख्या खेळांना प्राधान्य देऊन मुलांनी मैदानी खेळांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच आजच्या मोबाईलच्या युगात मुलांनी मोबाईलचा वापर केवळ गेम खेळण्यासाठी न करता त्याचा योग्य आणि शैक्षणिक उपयोग करावा. मोबाईलपेक्षा मैदानी खेळांना प्राधान्य देऊन शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक आहे, असेही डॉ. हुलवान यांनी सांगितले.

या कार्यक्रमास राजेश राऊळ, रमेश साखरे, शिवम देशमुख तसेच श्री दत्तगुरु वायशेत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संपूर्ण टीम उपस्थित होती.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना डॉ. राजाराम हुलवान यांनी शुभेच्छा देत स्पर्धा उत्साहात, शिस्तीत आणि खेळाडूवृत्तीने पूर्ण करण्याचे आवाहन केले.