वृक्षांचा सहावा वाढदिवस थळ डोंगरी येथे उत्साहात साजरा


अलिबाग(प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रोटरी जंगल मयेकर डोंगरी थळ येथे यापूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांचा सहावा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
वृक्षारोपण करून थांबण्यापेक्षा लावलेल्या वृक्षांची नियमित निगा राखणे, त्यांना पाणी देणे आणि त्यांचे संवर्धन करणे हीच खरी पर्यावरणसेवा आहे, हा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. निशिकांत पाटील, असिस्टंट सिव्हिल सर्जन डॉ. शीतल जोशी, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव चव्हाण, श्रीजाई फ्युचर एलएलपीचे संचालक डॉ. नितीन गांधी, सिव्हिल हॉस्पिटलचे रेसिडेंट मेडिकल ऑफिसर डॉ. किरण शिंदे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अंकुश पाटील, निमेश परब, डॉ. निलेश म्हात्रे, रोटरी सचिव सौरभ आपटे, कुमार जोगळेकर, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया जेधे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान वृक्षांची स्वच्छता करण्यात आली. झाडांच्या मुळाभोवतीचा परिसर स्वच्छ करून झाडांची योग्य निगा राखण्यात आली. आगामी काळात या वृक्षांना गांडूळ खत देऊन त्यांची वाढ अधिक चांगली होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

विशेषतः मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या काळात झाडांना नियमित पाणी देऊन ती सुकू नयेत यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात. दरवर्षी वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यामागचा उद्देश केवळ कार्यक्रम करणे नसून, लावलेल्या प्रत्येक झाडाची जबाबदारी स्वीकारणे आणि त्याचे संगोपन करणे हा आहे.

यावेळी डॉ. राजाराम हुलवान यांनी प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्याच्या वाढदिवसानिमित्त किमान एक तरी झाड लावावे आणि त्या झाडाची जबाबदारी स्वीकारून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. “वाढदिवस साजरा करण्याची पद्धत बदलून निसर्गाला वाढदिवसाची भेट देण्याची संस्कृती निर्माण झाली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव चव्हाण यांनी सांगितले की, “वृक्षांचा वाढदिवस हे केवळ एक निमित्त आहे. या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो आणि यापूर्वी लावलेल्या वृक्षांची वाढ व त्यांची निगा राखण्यासाठी पुन्हा एकदा कटिबद्ध होतो. झाड लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याला जगवणे आणि मोठे करणेही महत्त्वाचे आहे.”

विविध सामाजिक संस्थांनी ऐच्छिक स्वरूपात देणगी व सहकार्य देऊन वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धनाच्या उपक्रमाला हातभार लावला. सामाजिक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

“एक झाड लावा, एक झाड जगवा आणि प्रत्येक वाढदिवस निसर्गाच्या नावाने साजरा करा,” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.