रायगड (प्रतिनिधी): साई पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर, साई या शाळेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन तसेच शाळेचे ‘श्री. सुनील दत्तात्रेय तटकरे विद्यालय, साई’ असे नामकरण आज अत्यंत भावनिक आणि आनंददायी वातावरणात करण्यात आले. या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
नूतन वास्तूचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुनीलजी तटकरे, सौ. वरदा सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे तसेच विधानपरिषद आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद अमितदादा नाईक यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि बदलत्या काळानुसार त्यांचा शैक्षणिक विकास साधला जावा, या उद्देशाने नूतन शाळेची वास्तू साकारण्यात आली आहे. प्रशस्त व आधुनिक सुविधांनी युक्त असलेली ही वास्तू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अशा शैक्षणिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण मिळणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
‘श्री. सुनील दत्तात्रेय तटकरे विद्यालय, साई’ या नामकरणामुळे शाळेच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून, नूतन वास्तूच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शाळेच्या या नूतन पर्वामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.









