म्हसळ्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोन्ही आरोपी अटकेत


पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; पीडितेला मनोधैर्य योजनेतून मदतीची प्रक्रिया सुरू

रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना २४ ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्यानुसार म्हसळा पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करून संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही. आरोपींविरोधात उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर तरतुदींनुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने पूर्ण करून दोषींना कायद्यानुसार शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांवर आलेल्या मानसिक धक्क्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना आवश्यक आधार व मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पीडितेला शासनाच्या मनोधैर्य योजनेतून मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महिला आणि बालिकांच्या सुरक्षेला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्यवाही करावी, तसेच पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.