“सहकाराच्या पंचसूत्रीत संचालकाची नीतिमत्ता सर्वांत महत्त्वाची”


ॲड. प्रदीप म. पाटील; सहयोग पतसंस्थेची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

अलिबाग (प्रतिनिधी) : सहकारी संस्थेचा कारभार केवळ आर्थिक व्यवहारांपुरता मर्यादित नसून सभासदांचा विश्वास, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नैतिक मूल्यांवर तो उभा असतो. सहकाराच्या पंचसूत्रीत संचालकाची नीतिमत्ता अत्यंत महत्त्वाची असून संचालक पद हे अधिकाराचे नव्हे, तर सभासदांनी सोपविलेल्या विश्वासाचे पद आहे, असे प्रतिपादन विधिज्ञ ॲड. प्रदीप म. पाटील यांनी केले.
सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबागची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे, अलिबाग येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. पाटील बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष योगेश रामदास मगर होते. संस्थेचे उपाध्यक्ष संजय ह. पाटील, संचालक मंडळाचे सदस्य, सभासद आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
ॲड. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सहकार चळवळीचे महत्त्व विशद केले. सहकारी संस्थेची आर्थिक प्रगती महत्त्वाची असली, तरी सभासदांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास हीच संस्थेची खरी ताकद आहे. हा विश्वास कायम राखण्यासाठी संचालक मंडळाने प्रामाणिकपणा, पारदर्शकता, शिस्त, उत्तरदायित्व आणि सभासदहित या मूल्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
संचालकाने निर्णय घेताना व्यक्तिगत हितापेक्षा संस्थेचे आणि सभासदांचे हित सर्वोच्च मानले पाहिजे. संचालकाची नीतिमत्ता आणि निर्णयक्षमतेतून संस्थेच्या कारभाराची दिशा ठरते. त्यामुळे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या पदाकडे जबाबदारीच्या भावनेने पाहणे आवश्यक असल्याचे ॲड. पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सभेत संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा वार्षिक अहवाल, आर्थिक प्रगती, सभासदांच्या हितासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच आगामी काळातील संस्थेची वाटचाल याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विषयांवर सभासदांशी चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात योगेश मगर यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासद, संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सभासदांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याच्या बळावर संस्थेने प्रगतीची वाटचाल कायम ठेवली आहे. भविष्यात संस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि सभासदाभिमुख करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील, असे त्यांनी नमूद केले.
सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग आणि संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.