आदर्श मातांचा गौरव; ‘स्मृती दर्पण’ काव्यसंग्रहाचे उत्साहात प्रकाशन


अलिबाग (प्रतिनिधी) : श्री समर्थ विचार फाउंडेशन, रायगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘आदर्श माता गौरव पुरस्कार सोहळा’ तसेच ‘स्मृती दर्पण’ काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. मातृशक्तीच्या त्याग, संस्कार आणि कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या सोहळ्याला आमदार मा. श्री. महेंद्र दळवी, रायगड जिल्हाधिकारी मा. श्री. किसन जावळे, राष्ट्रवादी काँग्रेस (महाराष्ट्र प्रदेश) सरचिटणीस मा. ॲड. प्रविण ठाकूर, रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक, मा. सौ. अमृता अमित नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, माता-भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजाच्या जडणघडणीत मातांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कुटुंबाला संस्कार देण्यापासून ते मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण करण्यापर्यंत माता आपल्या आयुष्याचा मोठा वाटा समर्पित करतात. त्यांच्या या त्यागाची आणि योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने श्री समर्थ विचार फाउंडेशनच्या वतीने एकूण १४ आदर्श मातांचा गौरव करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यात रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतोद अमितदादा नाईक यांच्या मातोश्री मा. अनिता अशोक नाईक आणि आत्या मा. सुनंदा मधुकर ठाकूर यांचाही ‘आदर्श माता’ म्हणून सन्मान करण्यात आला. आपल्या कुटुंबातील मातृशक्तीचा गौरव होत असल्याचा हा क्षण उपस्थितांसाठीही भावनिक ठरला.

यावेळी ‘स्मृती दर्पण’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून घडून आला. मातृत्व, संस्कार, नाती आणि जीवनमूल्यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

मातृशक्तीचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून संपूर्ण समाजाच्या संस्कारपरंपरेचा गौरव आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मातांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांचा सन्मान केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी श्री समर्थ विचार फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.

अमितदादा नाईक यांनीही या प्रेरणादायी सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत मातांच्या त्याग, संस्कार आणि कर्तृत्वाला समाजाने नेहमीच योग्य सन्मान दिला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. तसेच श्री समर्थ विचार फाउंडेशनच्या पुढील सामाजिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

मातृशक्तीचा गौरव आणि साहित्यिक अभिव्यक्तीचा संगम घडवून आणणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.