गणरायाच्या विसर्जनासाठी जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा


५९५ विसर्जनस्थळी कडेकोट बंदोबस्त; जिल्ह्याबाहेरील पोलीस पथकेही तैनात

रायगड (प्रतिनिधी): सहा दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध विसर्जनस्थळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलिसांकडून जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यातील तब्बल ५९५ विसर्जनस्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
गणेश विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यात एकूण २ हजार ६४ पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. यामध्ये ७ पोलीस उपअधीक्षक, २९ पोलीस निरीक्षक, १२८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच १ हजार ९०० पोलीस अंमलदारांचा समावेश होता.
विसर्जन मिरवणुका, समुद्रकिनारे, नदीघाट, तलाव तसेच गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी आणि विसर्जन मिरवणुकांदरम्यान नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेवरही विशेष लक्ष देण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यातील बंदोबस्त अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्याबाहेरून अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ मागविण्यात आले होते. त्यामध्ये अधिकारी व पोलीस अंमलदारांसह होमगार्डचाही समावेश होता. उपलब्ध माहितीनुसार, बाहेरील मनुष्यबळामध्ये ३० अधिकारी, ३०० पोलीस अंमलदार आणि ५०० होमगार्ड तैनात करण्यात आले होते.
याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडीही जिल्ह्यात तैनात करण्यात आली होती. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक सुरक्षा मनुष्यबळाचा बंदोबस्त ठेवण्यात आला.
गणेशभक्तांनी शांततेत आणि उत्साहात गणरायाला निरोप द्यावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. विसर्जनाच्या ठिकाणी गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा दिवसभर सतर्क होती.