जागतिक समुद्र किनारा दिनानिमित्त अलिबागमध्ये स्वच्छता अभियान


‘स्वच्छ समुद्रकिनारा-सुंदर अलिबाग’चा संदेश; नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सहभाग

अलिबाग(प्रतिनिधी): जागतिक समुद्र किनारा दिनानिमित्त अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने आज, १९ सप्टेंबर रोजी सकाळी समुद्रकिनारा स्वच्छता व जनजागृती अभियान राबविण्यात आले. ‘स्वच्छ समुद्रकिनारा – सुंदर अलिबाग’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात समुद्रकिनाऱ्यावरील कचरा संकलित करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

अलिबाग शहराची ओळख आणि पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या समुद्रकिनाऱ्यांचे स्वच्छता, संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले होते. नागरिक, स्वयंसेवी संस्था, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांनी अभियानात सहभागी होऊन समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली.

जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, नगराध्यक्षा अक्षया प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा ऍड. मानसी म्हात्रे आणि मुख्याधिकारी सागर साळुंखे, नगरपरिषदेचे सभापती, उपसभापती, नगरसेवक, नगरसेविका आणि कर्मचारीवर्गाने अभियानात सहभाग घेतला.

समुद्रकिनाऱ्यावर वाढणारा प्लास्टिक व इतर कचरा हा पर्यावरणासाठी तसेच समुद्री जीवसृष्टीसाठी गंभीर धोका ठरत आहे. त्यामुळे केवळ एका दिवसापुरती स्वच्छता न ठेवता समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

‘स्वच्छ समुद्रकिनारा, हिरवी परंपरा, निरोगी उद्या’ या विचारातून अलिबागचा समुद्रकिनारा स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले.