कारलेखिंड-सारल रस्त्याचे काम रखडले; अपघाताचा धोका


अलिबाग (प्रतिनिधी): कारलेखिंड ते सारल मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम सुरू होऊन बराच कालावधी उलटला असतानाही अद्याप पूर्ण झालेले नाही. पूर्ण झालेल्या भागाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक भराव न केल्याने वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, महिला, कामगार आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. रस्त्याचे काम रखडल्याने तसेच कडेला भराव नसल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. सणासुदीच्या काळात या मार्गावर अपघातांच्या घटना घडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी रस्त्याचे काम एवढे दिवस का रखडले, पूर्ण झालेल्या भागाला भराव का करण्यात आला नाही आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असे सवाल उपस्थित केले आहेत.
संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रखडलेले काम पूर्ण करावे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भराव करावा आणि आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.