नवी मुंबई (प्रतिनिधी) : शहरात देहविक्री रॅकेटचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे. मसाज सेंटर आणि स्पाच्या आडून मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड होत असून, पोलिसांनी याविरोधात ‘ऑल आऊट’ कारवाई सुरू ठेवली आहे.
वाशीतील सेक्टर १९-डी परिसरातील सत्रा प्लाझा येथे टाकलेल्या छाप्यातून या रॅकेटचे धागेदोरे उलगडले. एपीएमसी पोलिसांनी हाय-प्रोफाइल भागात सुरू असलेल्या या अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश करत अनेक महिलांची सुटका केली. या कारवाईदरम्यान एका महिला दलालासह इतर दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीसीपी पंकज दहाणे (झोन १) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचत सत्रा प्लाझा इमारतीतील हॉटेल आणि मसाज स्पा सेंटरवर छापा टाकून आरोपींना पकडले.
तपासादरम्यान शहरातील विविध भागांमध्ये स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटमध्ये महिलांना सक्तीने ढकलले जात असल्याचेही समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये परदेशी महिलांचा सहभागही आढळून आला असून, बांगलादेश, थायलंडसह इतर देशांतील महिलांना या जाळ्यात ओढले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी शहरभर ‘ऑल आऊट ऑपरेशन’ सुरू केले असून संशयित ठिकाणांवर सातत्याने छापेमारी केली जात आहे. पीडित महिलांची सुटका, दलालांविरोधात कठोर कारवाई आणि रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.
तथापि, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच महिलांचे संरक्षण, परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्यावर नियंत्रण आणि स्पा-मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Home ताज्या बातम्या नवी मुंबई पोलिसांची ‘ऑल आऊट’ कारवाई सुरूच; वाशीतील हाय-प्रोफाइल भागात देहविक्रीचे जाळे...




