उरण (विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्रातील कष्टकरी, श्रमिक आणि विविध क्षेत्रांतील कामगारांच्या न्यायहक्कांसाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने गुरुवार, दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्यभरातून सुमारे १० हजारांहून अधिक कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
या मोर्चात घरेलू कामगार, बांधकाम कामगार, वीज क्षेत्रातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, रिक्षा-टॅक्सी चालक, फेरीवाले, विडी कामगार, जलसेवा कर्मचारी, नगरपालिका व सहकारी बँक कर्मचारी, राष्ट्रीय बँक, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, संरक्षण, माथाडी, एसटी महामंडळ, रुग्णालय तसेच टोल नाक्यांवरील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करणे, कंत्राटदार पद्धतीत सुधारणा करणे आणि कंत्राटी कामगारांना कंत्राटदारमुक्त सेवेसाठी हरियाणा पॅटर्न लागू करणे यांचा समावेश होता. याशिवाय वीज, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व युवा उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रांप्रमाणे कामगारांसाठीही ठोस आणि सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
मोर्चानंतर कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगारमंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी मंत्री फुंडकर यांनी कामगारांच्या मागण्यांवर तातडीने विचार केला जाईल, तसेच संबंधित सर्व विभागीय मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या नेत्यांनी दिला.
Home ताज्या बातम्या न्यायहक्कासाठी कामगारांचा एल्गार; भारतीय मजदूर संघाचा कामगार आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा





