रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाचे मंत्रीपद असतानाही अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रकार थांबलेले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या नजरेआड, छुप्या पद्धतीने होत असलेल्या बालविवाहांमुळे अनेक मुलींना लहान वयातच मातृत्वाचा भार उचलावा लागत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२४ या वर्षात जिल्ह्यातील २३७ अल्पवयीन मुली माता झाल्या होत्या. त्यानंतर २०२५ मध्ये हा आकडा वाढून २४८ वर पोहोचला. चालू वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत ४० अल्पवयीन मुलींनी मातृत्व स्वीकारले आहे. या तिन्ही वर्षांचा एकत्रित विचार करता, गेल्या तीन वर्षांत तब्बल ५२६ अल्पवयीन मुली माता झाल्याचे स्पष्ट होते.
या वाढत्या आकड्यांमुळे जिल्ह्यातील बालविवाह प्रतिबंधक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याने बालविवाहावर बंदी असतानाही काही ठिकाणी सामाजिक दबाव, आर्थिक परिस्थिती, तसेच पारंपरिक प्रथांमुळे असे विवाह लपूनछपून पार पडत असल्याचे दिसून येते. परिणामी, शिक्षणाच्या वयात असलेल्या मुलींना आरोग्याच्या आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
तज्ज्ञांच्या मते, अल्पवयात मातृत्व स्वीकारल्यामुळे मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच त्यांच्या शिक्षणात खंड पडून भविष्यातील संधीही मर्यादित होतात. त्यामुळे केवळ कायदे करून चालणार नाही, तर जनजागृती, कठोर अंमलबजावणी आणि स्थानिक पातळीवर सक्रिय देखरेख आवश्यक आहे.
प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गावपातळीवर सतर्कता समित्या सक्रिय करणे, शाळा-कॉलेजांमधून जागरूकता वाढवणे आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे, या उपायांमुळेच या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





