‘कैसा हराया…’ फेम सहर शेख नॉट रिचेबल; जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे नगरसेवकपद धोक्यात


ठाणे (प्रतिनिधी): ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांनी विजय मिळवत राजकारणात दमदार एन्ट्री केली होती. त्यांच्या ‘कैसा हराया…’ या डायलॉगची ठाणे, मुंबईसह राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. मात्र आता याच सहर शेख अडचणीत सापडल्याचं समोर आलं आहे.
सहर शेख यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेषतः त्यांच्या वडील युनूस शेख यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर सहर शेख आणि त्यांचे वडील दोघेही काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती पुढे आली आहे. ते मुंब्रा परिसरातही नसल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकरणात सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी तक्रार दाखल केली होती. त्या स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून याच प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार होत्या. त्यांच्या तक्रारीनुसार, सहर शेख यांच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, सहर शेख यांनी निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल करून बनावट जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून हे प्रमाणपत्र घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित असून, त्यानंतर या प्रकरणावर अधिक स्पष्टता येणार आहे. मात्र या सर्व घडामोडींमुळे सहर शेख यांच्या नगरसेवकपदावर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.