अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या मालिकेला अखेर पोलिसांनी आळा घालत एक आरोपी जेरबंद केला आहे. ऑनलाईन रमी खेळण्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झालेल्या या आरोपीने कर्जफेडीसाठी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत 2024 ते 2026 या कालावधीत वारंवार घरफोड्यांच्या घटना घडत होत्या. विशेषतः शिहू, बेणसे, मुंढाणी, झोथीपाडा या गावांमध्ये रात्रीच्या वेळी बंद घरांना लक्ष्य करत चोरी केली जात होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर काही काळ चोरीच्या घटना कमी झाल्या, मात्र पुन्हा त्या सुरू झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून सखोल तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंढाणी येथील आदित्य अमृत कुठे (वय 23) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्याच्या हालचाली, आर्थिक व्यवहार व बँक स्टेटमेंटची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने नागोठणे परिसरातील तसेच इतर गावांतील घरफोड्यांची कबुली दिली.
चौकशीतून उघड झाले की आरोपीला ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन होते. या व्यसनामुळे तो मोठ्या प्रमाणावर पैसे गमावत गेला आणि त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढला. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने वारंवार घरफोड्या करून चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305 व 331 अन्वये गुन्हे नोंद असून त्याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला नागोठणे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.






