खोदकामांतील धुळीने वाहनचालक त्रस्त; कामे रखडल्याने वाढल्या अडचणी


अलिबाग (प्रतिनिधी): शहर व परिसरात विविध विकासकामांसाठी सुरू असलेल्या रस्ते, पूल व नाले खोदकामामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः वाहनचालकांना रस्त्यांवरील धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
अनेक ठिकाणी रस्ते खोदून कामे अर्धवट स्थितीत ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात माती व खडी पसरली आहे. वारा सुटला की ही धूळ हवेत उडते आणि दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांचे दृश्य अस्पष्ट होते. परिणामी, वाहन चालवताना अडथळे निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढत आहे.
दरम्यान, पावसाळा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. जर ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर पावसामुळे रस्त्यांची परिस्थिती अधिक बिकट होईल. चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून, सुरू असलेली कामे जलदगतीने पूर्ण करून रस्ते सुरळीत करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.