अलिबाग किनाऱ्यावर ‘ब्लू बटन’चा धोका; पर्यटकांना सतर्कतेचा इशारा


अलिबाग (प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर दाखल होत आहेत. मात्र, अलीकडे किनाऱ्यावर आढळून आलेल्या ‘ब्लू बटन’ (जेलीफिशसदृश सागरी जीव) मुळे पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आकर्षक निळ्या रंगामुळे लक्ष वेधून घेणारा हा जीव प्रत्यक्षात धोकादायक ठरू शकतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
समुद्राच्या लाटांसोबत किनाऱ्यावर येणारा ‘ब्लू बटन’ हा नाजूक आणि सुंदर दिसणारा जीव असून त्याच्या निळ्या कडा आणि मध्यभागी असलेली गोलाकार रचना पर्यटकांना भुरळ घालते. त्यामुळे अनेक जण उत्सुकतेपोटी त्याला हात लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या जीवाच्या स्पर्शामुळे त्वचेवर जळजळ, खाज, लालसरपणा किंवा सौम्य चटके बसू शकतात. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये ही प्रतिक्रिया अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि पर्यटकांनी अशा अज्ञात सागरी जीवांपासून दूर राहावे, असे आवाहन स्थानिक प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींनी केले आहे. काही वेळा हे जीव मोठ्या संख्येने किनाऱ्यावर वाहून येतात, ज्यामुळे धोका अधिक वाढतो. त्यामुळे किनाऱ्यावर फिरताना अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे ठरते.
दरम्यान, सुट्ट्यांमुळे अलिबाग किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या वाढत असताना अशा घटनांमुळे सुरक्षेच्या दृष्टीने अधिक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना सूचना देण्यास सुरुवात केली असून, समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात वस्तू किंवा सागरी जीवांना स्पर्श न करण्याचे आवाहन केले आहे.
निसर्गाचे मोहक रूप आकर्षक असले, तरी त्यामागील संभाव्य धोका लक्षात घेऊनच पर्यटकांनी वावरावे. सुरक्षिततेला प्राधान्य देतच समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.