महालक्ष्मी सरस प्रदर्शनात रायगडच्या २८ बचतगटांचा उत्स्फूर्त सहभाग


अलिबाग (प्रतिनिधी): बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर २ ते १४ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातील २८ महिला बचतगटांनी सहभाग नोंदवला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या वस्तूंना खुली बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या प्रदर्शनाची तुलना जागतिक दर्जाच्या प्रदर्शनांशी करता येईल, असे सांगत त्याच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले.
रायगड जिल्ह्यातील सहभागी २८ बचतगटांपैकी २४ गटांनी विविध हस्तकला, घरगुती उत्पादने व इतर वस्तूंचे स्टॉल लावले आहेत, तर ४ गटांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले आहेत. नागरिकांकडून या उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यामुळे महिलांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा महिला समन्वयक म्हणून निशा आवस्कर आणि जिल्हा समन्वयक म्हणून सौरभ देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१४ मेपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन महिला बचतगटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी केले आहे.