
रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पक्षातील अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पक्षप्रवेश सोहळ्यातही घारे यांची नाराजी उघडपणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांच्या अचानक संपर्काबाहेर जाण्यामागे नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचे जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन्ही नेत्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची कोंडी झाल्याची चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर सुधाकर घारे यांच्या नाराजीमागे हीच घडामोड कारणीभूत आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. एकूणच या घटनांमुळे रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





