
अलिबाग (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेमधील काही कर्मचारी नियुक्ती झालेल्या ठिकाणी नियमितपणे कामावर जात नसून राजकीय वशिलेबाजी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून मनाप्रमाणे प्रतिनियुक्ती मिळवत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केला आहे. या प्रकारामुळे प्रामाणिकपणे आणि नियमांनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राजा केणी यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेमधील अनेक विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असताना काही कर्मचारी मूळ नियुक्तीच्या ठिकाणी न जाता राजकीय दबावाचा वापर करून सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील अनेक कार्यालयांमध्ये कामकाजावर परिणाम होत असून सामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
“ज्या कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे त्यांनी नियमानुसार नियुक्तीच्या ठिकाणी सेवा बजावणे आवश्यक आहे. अन्यथा प्रशासनाची शिस्त बिघडते आणि जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच जिल्हा परिषद प्रशासनाने अशा प्रकरणांची गंभीर दखल घेऊन प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी करावी, अनधिकृत प्रतिनियुक्ती रद्द करावी आणि नियमभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
जिल्हा परिषदेमधील कामकाज अधिक पारदर्शक आणि नियमित होण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.






