
नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबईच्या खारघर परिसरात घडलेल्या ५७ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या लूटप्रकरणाचा खारघर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली असून, पीडित व्यक्तीचा जवळचा मित्रच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ आरोपींना अटक करत लुटलेले सोने, शस्त्रे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त केली आहेत.
खारघर येथील रहिवासी सुशांत नामदेव मोरे (वय ३७) हे २२ एप्रिल रोजी मित्रांसोबत बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून परतत होते. रात्री उशिरा ते घरी पोहोचल्यानंतर कार पार्क करून घराकडे जात असताना तीन अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत मोरे यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आला. त्यानंतर चालक महेश हाटे यांच्या ताब्यात असलेली ५७ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेनंतर खारघर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली पोलिसांची विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. फिर्यादीचा जवळचा मित्र अभिनंदन तानाजी माळी यानेच पत्नी कोमल माळी, वैभव माळी आणि इतर साथीदारांच्या मदतीने संपूर्ण कट रचल्याचे उघड झाले. सोन्याच्या हालचालींबाबतची माहिती आरोपींकडे आधीपासूनच असल्याने नियोजनपूर्वक ही लूट करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
गुन्ह्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तेलंगणा, सांगली, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर अशा विविध ठिकाणी सतत वास्तव्य बदलले. मात्र पोलिसांनी सापळा रचत आरोपींचा माग काढला आणि अखेर शुभम पाटोळे, संदीप गुजंळे, हर्षद सागरे आणि राहुल उर्फ अमित माळी यांच्यासह सात जणांना अटक करण्यात यश मिळवले.
पोलिसांनी आरोपींकडून ५७ तोळे सोन्याचे दागिने, मारुती स्विफ्ट कार, दुचाकी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली शस्त्रे जप्त केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास खारघर पोलीस करत आहेत.





