इंधन दरवाढीविरोधात रायगड जिल्हा काँग्रेसचे अलिबागेत जनआंदोलन बैलगाडीसह मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी


अलिबाग (प्रतिनिधी): वाढती महागाई, इंधन दरवाढ तसेच घरगुती व व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याच्या निषेधार्थ रायगड जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी अलिबाग शहरात जनआंदोलन करण्यात आले. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, डॉ. मनिष पाटील आणि पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
केंद्रातील भाजपा सरकारच्या धोरणांमुळे देशात महागाई वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून याविरोधात काँग्रेसने जनसामान्यांच्या भावना ओळखून हे आंदोलन उभारल्याचे सांगण्यात आले.
अलिबाग शहरातील काँग्रेस भवन येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा भाजपच्या जुन्या कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी तेथेही जोरदार निदर्शने केली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी कमरेला माडाच्या झावळ्या बांधून वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला. कार्यकर्त्यांच्या हातात केंद्र सरकारविरोधातील फलक आणि इंधन दरवाढीविरोधातील झेंडे दिसून येत होते. विशेष म्हणजे आंदोलनातील बैलगाडी आणि बैलजोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वाढत्या इंधन दरांमुळे सामान्य माणसाला पुन्हा पारंपरिक साधनांकडे वळावे लागण्याची वेळ आल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.