प्रशासनाच्या नियमांचे पालन गरजेचे; जलवाहतूक आणि जलक्रीडा व्यवसाय पावसाळ्यासाठी बंद


अलिबाग (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील जलवाहतूक आणि जलक्रीडा व्यवसायावर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. समुद्रातील वाढलेला धोका, खराब हवामान आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे अनेक व्यावसायिकांनी स्वागत केले आहे.
कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर जलक्रीडा आणि बोट व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, चार महिन्यांच्या पावसाळी कालावधीत हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होत असल्याने आर्थिक अडचणी निर्माण होतात. तरीही पर्यटकांच्या जीविताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली.
“पावसाळ्यात समुद्राचा अंदाज घेणे कठीण असते. अचानक वारे, उंच लाटा आणि बदलणारे हवामान यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करून आम्ही बोटी सुरक्षित स्थळी हलवत आहोत,” अशी प्रतिक्रिया एका जलक्रीडा व्यावसायिकाने दिली.
दरम्यान, प्रशासनाकडून किनारपट्टी भागात सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात येत असून पर्यटकांनीही नियमांचे पालन करून समुद्रकिनारी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा जलक्रीडा आणि पर्यटन व्यवसाय पूर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.