जांभूळपाडा-कार्लेखिंड मार्गावरील अपघातांप्रकरणी मनसेची पोलिसांकडे तक्रार; ठेकेदारावर कारवाईची मागणी


अलिबाग (प्रतिनिधी) : जांभूळपाडा ते कार्लेखिंड या मार्गावर सुरू असलेल्या रस्ते कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाईची मागणी केली आहे. याबाबत मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी पोयनाड पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जांभूळपाडा-कार्लेखिंड मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू असून कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेले इशारे, बॅरिकेड्स, प्रकाश व्यवस्था आणि इतर सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून आतापर्यंत या मार्गावर सुमारे २५ अपघात झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या अपघातांमध्ये अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि संबंधित विभागावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनसेने पोलिस प्रशासनाकडे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्ते कामाच्या ठिकाणी त्वरित सुरक्षा उपाययोजना राबवून पुढील अपघात टाळावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जांभूळपाडा-कार्लेखिंड मार्गावरील अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.