अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग-पेण मार्गावर मंगळवारी सकाळी महाकाय बॉयलर वाहून नेणाऱ्या ट्रेलरमुळे तिनविरा ते कार्लेखिंड दरम्यान वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. सकाळच्या गर्दीच्या वेळेत झालेल्या या कोंडीमुळे शाळकरी विद्यार्थी, चाकरमानी आणि कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
थळ येथील आरसीएफ कंपनीच्या युरिया प्रकल्पासाठी आवश्यक असलेले अवजड बॉयलर ट्रेलरद्वारे आणले जात आहेत. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बॉयलर घेऊन जाणारे ट्रेलर तिनविरा मार्गे पुढे जात असताना अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. परिणामी काही काळ मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या.
जिल्ह्यात शाळा व महाविद्यालये सकाळच्या सत्रात सुरू असल्याने विद्यार्थ्यांना तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचण्यात अडचणी आल्या. दरम्यान, जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी घटनास्थळी उपस्थित राहून वाहतुकीचे नियोजन केले. पोलिसांच्या प्रयत्नांमुळे काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.







