मुरूड (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांना पुन्हा गती देण्याच्या उद्देशाने मुरूड तालुक्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. निवडणुकांच्या आचारसंहिता व विविध निवडणूक प्रक्रियांमुळे काही विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम पुढे ढकलावे लागले होते. मात्र आता ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहीते यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांच्या विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ज्या भागातील नागरिकांना सामोरे जावे लागले, त्या भागातील विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून मुरूड तालुक्यातील खारीकवाळा येथे अंगणवाडी इमारतीच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच नांदगाव येथील रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामालाही प्रारंभ करण्यात आला. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे १२ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्याद्वारे रस्त्याचे नूतनीकरण व मजबुतीकरण केले जाणार आहे.
निवडणुकांच्या धावपळीतही विकासकामांबाबतची बांधिलकी कायम ठेवली असल्याचे सांगताना त्यांनी समाधान व्यक्त केले. “लोकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. पक्षाच्या माध्यमातून विकासकामे राबविण्याची संधी मिळत असल्याचा आनंद आहे. आगामी काळातही मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवून अधिकाधिक विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल,” असे त्यांनी सांगितले.
या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार असून, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.






