रायगड पोलिस दलाची उल्लेखनीय कामगिरी; राज्यस्तरावर प्रथम क्रमांक


रायगड (प्रतिनिधी): रायगड पोलिस दलाने मार्च २०२६ मध्ये सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम्स) कार्यप्रदर्शनामध्ये संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे रायगड पोलिस दलाच्या कार्यक्षमतेची आणि तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगमधील प्रगतीची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
सीसीटीएनएस ही गुन्हे नोंदणी, तपास, माहिती व्यवस्थापन आणि नागरिकांना विविध पोलिस सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पोलिस कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी सीसीटीएनएस प्रणालीचा प्रभावी वापर करत माहिती अद्ययावत ठेवणे, गुन्ह्यांची अचूक नोंद, तपासातील माहितीचे संगणकीकरण आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली.
या यशाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “मार्च २०२६ मध्ये सीसीटीएनएस कार्यप्रदर्शनात राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त होणे ही रायगड पोलिस दलासाठी अभिमानाची बाब आहे. ही कामगिरी जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि अंमलदार यांच्या समर्पित सेवाभाव, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि अथक परिश्रमांचे फलित आहे. तंत्रज्ञानाधारित पोलिसिंग अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
यापुढेही नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी रायगड पोलिस दल कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या यशामुळे जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भविष्यातही अशाच उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.